कन्नड शाळांना अल्पभाषिक दर्जासाठी जुनी पेन्शन हक्क संघटना व आदर्श कन्नडच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले. यावेळी अमोल शिंदे, आर. के. पाटील, मिलन नागणे, मलिकजान शेख, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषदेच्या कन्नड माध्यमाच्या शाळांना अल्पभाषिक दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व आदर्श कन्नड बळग महाराष्ट्र यांनी तसे संयुक्त निवेदन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांची भेट घेऊन साकडे घातले. जत पंचायत समितीचे माजी सभापती आर. के. पाटील, आदर्श कन्नड बळग महाराष्ट्रचे अध्यक्ष मलिकजान शेख, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष वीरेश हिरेमठ, मिलन नागणे, जत तालुका अध्यक्ष गुरुबसू वाघोली, आदींनी चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यात मोठ्या संख्येने कन्नड प्राथमिक शाळा आहेत. तेथे कन्नड व मराठी अशा दोन्ही माध्यमांत शिक्षण चालते. या शाळांना अल्पभाषिक दर्जा दिल्यास शाळांचा दर्जा सुधारण्याकडे अधिक लक्ष देता येईल. शैक्षणिक सुविधा मिळतील. कन्नडसोबतच मराठी भाषेविषयीही विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे शक्य होईल.
यावेळी विषयशिक्षक वेतनश्रेणी, शालार्थ सुधारणा, वैद्यकीय बिले, वरिष्ठ वेतनश्रेणी, जिल्हा परिषदेत सादर केलेल्या प्रस्तावांचे ऑनलाईन ट्रॅकिंग, इत्यादी विषयांवरही चर्चा झाली.