कोकरुड : नव्याने करण्यात येत असलेल्या कोकरुड-पाचवड फाटा राज्यमार्गावरील सर्व गावांच्या ठिकाणी आरसीसी गटारी बांधव्यात आणि काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
कोकरुड ते पाचवड फाटा (कऱ्हाड) या राज्यमार्गाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या कामास वर्षापूर्वी सुरुवात झाली आहे. हा रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातून पुढे कोकणातील राजापूर येथे जोडला जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या काळात हे काम सहा महिने पूर्ण ठप्प झाले होते. ते दोन महिन्यांपूर्वी पुन्हा सुरू झाले आहे. ओढ्यावरील पूल बांधणी अजून बाकी आहे. मात्र, डांबरीकरण घोगावपर्यंत (ता. कऱ्हाड) पूर्ण झाले आहे. त्यापुढील दहा किलोमीटरचे काम न करता ठेकेदाराने थेट शिराळा तालुक्यात रुंदीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे.
येणपे खिंड ते खुजगावपर्यंतचा मार्ग पूर्ण उकरून ठेवला आहे. त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. त्यातच या मार्गावरील मेणी फाटा, सय्यदवाडी, येळापूर, जामदारवाडी, शेडगेवाडी, खुजगाव, चिंचोली, कोकरुड या गावच्या ठिकाणी आरसीसी गटारी बांधल्या नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील सर्व पाणी शेजारील घरात घुसणार आहे.
फोटो-२१कोकरुड०१ : सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथे रस्ता रुंदीकरणामुळे धोका निर्माण झालेला असतानाच रस्त्याच्या वरच्या बाजूस आरसीसी गटार नसल्याने रस्त्यावरून येणारे सर्व पाणी घरात घुसणार आहे.