संख : जत पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. २०१७-१८ पासून हा पुरस्कार बंद केला आहे. यंदा प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी केली आहे.
ते म्हणाले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे शिक्षक गेली दोन वर्षे कोरोनासारख्या महामारीत ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची अंमलबजावणी करीत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध शैक्षणिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांसह महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन पंचायत समितीने शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.