सांगली : राज्य शासनाने हमाल, माथाडी कामगार यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले, पण अद्याप लसीकरण केले नाही. त्यांच्यासाठी विशेष कक्ष निर्माण करून लसीकरण त्वरित करावे, अशी मागणी हमाल पंचायतीने केली.
सरचिटणीस विकास मगदुम व बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांनी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, बाजार समिती, रेल्वे मालधक्का, शासकीय गोदाम, केंद्रीय वखार महामंडळाची गोदामे, फळ मार्केट आदी ठिकाणी शेकडो हमाल काम करत आहेत. बाजार समितीत महिला माथाडी कामगार काम करताहेत. या सर्वांना शासनाने अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून जाहीर केले. त्यांच्या लसीकरणाकडे मात्र दुर्लक्ष केले.
हमाल, माथाडी काम करत असलेली सर्व ठिकाणे मोठ्या गर्दीची आहेत, त्यामुळे अनेक हमाल आजपर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांचे लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. सध्या लसीचा तुटवडा असला तरी उपलब्धतेनुसार विशेष मोहीम राबवावी. यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर उपस्थित होते.
चौकट
हमाल, माथाडींसाठी मदतीची मागणी
हमाल, माथाडी, तोलाईदारांसाठी शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. लॉकडाऊन काळासाठी शासनाने असंघटित कामगारांना मदत जाहीर केली, त्यात हमाल, माथाडी कामगारांचा समावेश नाही. लॉकडाऊन काळात बाजारपेठा बंद राहिल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर कारावे.