येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील जंगम डीपी पाच दिवसांपूर्वी जळाला आहे. या डीपीवर काही शेतकऱ्यांच्या फळबागा व फुलबागा अवलंबून आहेत. वीज बंद असल्याने पाणीपुरवठा ठप्प हाेऊन ऐन उन्हाळ्यात पिके अडचणीत आली आहेत.
नवीन डीपी बसवला नसल्याने पाण्याअभावी येथील शेतकरी अच्युत आनंदराव पाटील यांनी आपल्या एक एकर ऊस शेतात झेंडू फुलाचे आंतरपीक घेतले होते. चार दिवस पाणी न मिळाल्याने झेंडू वाळू लागल्याने त्यांनी झेंडू काढून टाकला आहे. आजअखेर महावितरणने नवीन डीपी बसवलेला नाही. या डीपीवर येणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांनी विद्युत मोटारींचे वीज बिल भरले तरच नवीन डीपी बसविला जाईल, असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.
सध्या कडक उन्हाळा असल्याने पिकांना सारखे पाणी द्यावे लागत आहे. लवकर डीपी बसविला नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महावितरणच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.