विकास शहाशिराळा : चांदोली-वारणावती ( ता.शिराळा) येथे मातीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण झाले, तेव्हापासून कोयना धरण व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत, त्यामुळे वारणावती येथे भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले मात्र, आता हे यंत्र कालबाह्य झाले आहे. याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नाही, त्यामुळे हे भूकंप मापक कार्यालय असून नसल्यासारखे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी अत्याधुनिक भूकंप मापन यंत्र बसवावे व अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. हीच अवस्था कोकरूड येथील केंद्राची आहे.चांदोली धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली, त्यावेळी १९८६ मध्ये याठिकाणी भूकंप मापन यंत्र बसविण्यात आले. यामध्ये हाताने या यंत्रातील कागद बदलणे, यंत्राद्वारे निघालेल्या आलेखावरून किती रिकटर स्केलचा भूकंप झाला याचा निष्कर्ष काढला जातो. आज या यंत्रास ३२ वर्षे झाली, अनेक नवीन तंत्रज्ञान आले मात्र आजही हे जुनेच यंत्र वापरले जाते. हे यंत्र अनेक वेळा बंद पडले आहे. भूकंप झाल्यावर हे यंत्र बंद पडल्यास इतर कार्यालयाकडून माहिती घेऊन भूकंपाचे गणित मांडले जाते.हे यंत्र जुने झाले त्याचबरोबर गेल्या काही वर्षापासून याठिकाणी प्रशिक्षित कर्मचारी नाही.तेथे असणारे सुरक्षा रक्षक या यंत्रातील कागद बदलणे , नोंदी ठेवणे अशी कामे करीत आहेत तर काही वेळा निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून भूकंपाचे गणित मांडले जाते. चांदोली धरण हे महत्त्वाचे ठिकाण आहे, त्यामुळे येथे भूकंप मापन केंद्र आधुनिक पद्धतीचे तसेच प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक आहे.
कर्मचारी नाहीत म्हणून यंत्र तसेच कार्यालयही बंदकर्मचारी नाहीत म्हणून चिखली (संगमेश्वर), साखरपा , मराठवाडी(सातारा) येथील भूकंप मापन यंत्र बंद आहेत तसेच कार्यालयही बंद करण्यात आली आहेत. आता चांदोली (वारणावती) व कोकरूड येथे ही कार्यालये व यंत्रे सुरू आहेत. चांदोली व कोकरूड या दोन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षकच केंद्र चालवत आहेत. प्रयोग शाळा सहाय्यक पदाचे कर्मचारी निवृत्त झाले आहेत मात्र अजूनही या रिक्त जागा भरलेल्या नाहीत.