अशोक पाटील
इस्लामपूर : पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता. आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.
उरुण-इस्लामपूरपैकी उरुणची निर्मिती पहिल्यांदा झाली. उरुणावती देवीच्या नावावरून एका वस्तीला उरुण हे नाव पडले. त्यानंतर विस्तारित झालेल्या वस्त्यांना इस्लामपूर असे नाव देण्यात आले. शासन दरबारी उरुण-इस्लामपूर हेच नाव आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी इस्लामपूरला ‘ईश्वरपूर’ संबोधून काही ठिकाणी फलकही लावले होते. परंतु या नावाला शासनाची मान्यता मिळाली नाही. आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.
विकासकामे, भुयारी गटार योजना यावरून सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादासाठी संघर्ष टोकाला गेला असतानाच शिवसेनेने नामकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
नगरपालिकेतराष्ट्रवादीची सत्ता असताना शिवसेनेने आणि काही संघटनांनी ईश्वरपूरचा मुद्दा पालिकेच्या सभागृहात आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा विषय बाजूला ठेवला जात होता. आता पालिकेत आमची सत्ता आहे. ती मुदत काही दिवसात संपणार आहे. त्यामुळे नामकरणाचा विषय मंजुरीसाठी सभागृहात ठेवणार आहोत. -आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक, शिवसेना.