दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे दिघंचीत राष्ट्रीयीकृत बँक लवकर सुरू करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
दिघंचीमधील नागरिकांना बँकेच्या कामासाठी आटपाडीला जावे लागत आहे. आटपाडीला बँकेत जाऊनही वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. एका कामासाठी दोन ते तीन वेळा हेलपाटे मारावे लागतात. याचा त्रास नागरिकांना होत आहे.
आटपाडी तालुक्यातील सर्वांत मोठी व्यापार पेठ दिघंची आहे. त्याचबरोबर या भागात चार हायस्कूल व महाविद्यालय असून विद्यार्थी संख्याही माेठी आहे. शालेय विद्यार्थ्यांना बँक खात्याची आवश्यकता असते. दिघंचीत राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने त्यांना आटपाडीला जावे लागते.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा दिघंचीत आहे. सध्या याच बँकेचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे. सांगली बँकेत पीएम किसान, निराधार, दिव्यांग व इतर योजनांचे पैसे जमा होत असल्याने या बँकेतही नेहमी गर्दी असते.
दिघंची पुजारवाडी पांढरेवाडी उंबरगाव लिंगीवरे राजेवाडी पळसखेल विठलापूर या सहा सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील काही गावांतील नागरिकही बँकेच्या कामासाठी आटपाडीला येत असतात. त्यामुळे दिघंचीत राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
चौकट:-
दिघंचीत राष्ट्रीयीकृत बँक नसल्यामुळे आम्हाला पैसे भरण्यासाठी किंवा बँकेच्या कोणत्याही कामासाठी आटपाडीला हेलपाटे मारावे लागत आहेत. दिघंचीसह इतर गावातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिघंचीत राष्ट्रीयीकृत बँकेची अत्यंत गरज आहे.
- शहाजी शंकर पवार
बँक ग्राहक, पांढरेवाडी