म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयावर म्हैसाळ, नरवाड, विजयनगर या तीन गावांचा ताण पडत आहे. अशा रुग्णालयात अन्य कामासाठी शिपाई उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. यामुळे रुग्णालयात शिपाई भरती करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
म्हैसाळ-नरवाड मार्गावर पाझर तलावाजवळ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या अंतर्गत पशुगणनेनुसार सुमारे सात हजार पशुंची नोंद आहे. रोज रुग्णालयामध्ये जनावरांवर उपचारासाठी गर्दी होत असते. कामाचा ताण वाढत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना शेतात व वाड्यावस्तीवर सेवा देण्यास जाताना रुग्णालय बंद करावे लागते. मात्र अशावेळी रुग्णालयात जर एखादे जनावर उपचारासाठी आले तर अधिकारी हजर नसतात असा ग्रामस्थांचा गैरसमज होतो. गैरसोय नको म्हणून अधिकाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर आपला क्रमांक लिहून ठेवला आहे. मात्र सर्वच सुशिक्षित असतात असे नाही. यामुळे त्यांची गैरसोय होते. अधिकाऱ्यांचे काम चांगले असूनही कर्मचारी नसल्याने अधिकाऱ्यांवर ताण पडत आहे. यामुळे तत्काळ शिपाई पद भरावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.
कोट
म्हैसाळ, नरवाड, विजयनगर या भागात शेतात जास्त वस्ती असल्याने तेथे जाऊन उपचार करावे लागतात. व्हिजिटला गेल्यावर रुग्णालय बंद करावे लागते. अशावेळी शेतकऱ्यांचा गैरसमज होतो. त्यामुळे तत्काळ एक शिपाई या रुग्णालयात भरती करावा अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करणार आहोत.
- परेशबाबा शिंदे-म्हैसाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, म्हैसाळ.
कोट
शासनाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ मी काम करतो. व्हिजिटसाठी घरापर्यंत जावे लागते. त्यावेळी दवाखाना बंद करावा लागतो. पण कोणतेही जनावर उपचारापासून वंचित राहू नये म्हणून रुग्णालयाबाहेर माझा फोन नंबर लिहून ठेवला आहे. रात्री कितीही उशीर झाला तरी सेवा दिल्याशिवाय घरी जात नाही.
- डॉ. एस. बी. गोंदकर, पशुधन विकास अधिकारी, म्हैसाळ.
फोटो-११म्हैसाळ१