पलूस येथे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने आमदार अरुण लाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, प्रवीण कोले, अतुल बेळे, राकेश संगलगे, अभिजित सावगावे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पदवीधर अभियंत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार अरुण लाड यांनी दिली. सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने त्यांना विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निवेदन दिले. शिष्टमंडळामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, प्रवीण कोले, अतुल बेळे, राकेश संगलगे, अभिजित सावगावे, प्रमोद जाधव, राहुल लाड, संकेत निकम आदींचा समावेश होता.
अभियंत्यांनी मागण्या केल्या की, सार्वजनिक बांधकाममध्ये दीड कोटी रुपयांच्या कामांसाठी नोंदणी मिळते, पण जिल्हा परिषदेत मात्र अशी तरतूद नाही, ती करण्यासाठी शासनाला भाग पाडावे. जिल्हा परिषदेतील २५-२५ योजनेतील कामांची बिले दीड-दोन वर्षांपासून मिळालेली नाहीत, त्यामुळे अभियंत्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. यामध्ये लक्ष घालून देयके त्वरित निकाली काढावीत.
आमदार लाड यांनी या संदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन दिले. सांगलीत अभियंता भवनासाठी निधी देण्याचे आश्वासनही दिले.
यावेळी संदीप सोलवंडे, सचिन यादव यांच्यासह पलूस तालुका संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.