शिराळा
: शिराळा नगरपंचायत हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांना कोविड नियमावलीत शिथिलता मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत शिराळा व्यापारी महासंघाच्यावतीने नायब तहसीलदार व्ही. डी. महाजन व सचिन कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 'ब्रेक दि चेन'अंतर्गत कठोर कोविड निर्बंध आणि नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमान्वये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मात्र या नियमामुळे शिराळा शहरामधील व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते व हातावर पोट असलेल्या दुकानदारांना मोठया आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. नगरपंचायत हद्दीत पहिल्यापासूनच कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे आदी सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सर्व व्यापार-व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे येथील सर्व दुकाने व आस्थापनांना कोविड नियमावलीत शिथिलता मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख, फेडरेशनचे राज्य सचिव अविनाश चितुरकर, विश्वास कदम, सचिन शेटे, उमेश कुलकर्णी, उमेश पोटे, शहाजी रसाळ, विजय शिंदे, संतोष सवाईराम, प्रकाश पुरोहित उपस्थित होते.