सांगली : पोलिसांनी अनिकेत कोथळे याच्या केलेल्या खून प्रकरणाचा गुरुवारी सर्वपक्षीय बैठकीत जोरदार निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच पोलिस अधिकाºयांची तातडीने बदली करून, पोलिस उपअधीक्षक दीपाली काळेंसह शहर पोलिस ठाण्यातील सर्वच कर्मचाºयांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहावर ही सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. सतीश साखळकर, अॅड. अमित शिंदे, आशिष कोरी, आश्रफ वांकर यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोथळेच्या खून प्रकरणाचा सर्वच कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध करून, पोलिसांच्या गुंडगिरीबद्दल संतापही व्यक्त केला.यावेळी साखळकर म्हणाले की, या घटनेमागे पकडण्यात आलेल्या संशयितांव्यतिरिक्त आणखी कोण अधिकारी आहेत का, याचाही तपास केला पाहिजे. हे प्रकरण तडीस जाईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. त्यासाठी समाजातील काही ज्येष्ठ लोकांची समिती गठित करण्यात येईल.अॅड. अमित शिंदे म्हणाले की, संबंधित अटक केलेल्या पोलिसांची खातेनिहाय चौकशी सहा महिन्याच्या आत पूर्ण करून त्यांना बडतर्फ करावे. शासकीय दस्तऐवज असलेले सीसीटीव्ही फुटेज गहाळ झाल्याबद्दल संबंधित ठाण्याच्या निरीक्षकावरही गुन्हा दाखल करण्यात यावा. सीसीटीव्ही बंद ठेवल्याप्रकरणी कारवाई झाली नाही, तर प्रत्येक गुन्ह्यात हीच पद्धत अवलंबून पोलिस व गुन्हेगार नामानिराळे राहतील, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. त्यामुळे पोलिस ठाण्यांवर वॉच ठेवण्यासाठीही सीसीटीव्ही बसवायला हवेत.राष्टÑवादीचे शहराध्यक्ष सागर घोडके म्हणाले की, ज्या व्यक्तीवर यापूर्वी एकही गुन्हा नोंद नाही, त्याच्यासाठी अशा प्रकारची थर्ड डिग्री वापरली गेली. वास्तविक त्याच्यावर दाखल गुन्ह्याचीच सत्यता तपासली जायला हवी होती. पोलिसांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी दलातील वरिष्ठ अधिकाºयांनी उपाययोजना केल्या पाहिजेत.अवामी पक्षाचे आश्रफ वांकर म्हणाले की, अशा प्रकरणांमुळे पोलिस हे आधार वाटण्याऐवजी त्यांची दहशतच वाटू लागेल. समाजाचे स्वास्थ्य अशा घटनांनी बिघडू शकते. त्यामुळे खून प्रकरणातील पोलिसांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी ही केस मजबूत करावी.भाजपचे श्रीकांत शिंदे म्हणाले की, आ. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चांगली होती. त्यामुळे पोलिसांवर दबाव आला. अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.मनसेचे अमर पडळकर म्हणाले की, पोलिसांमधील दहशतवाद मोडीत काढलाच पाहिजे, पण त्याचबरोबरच कायद्याचा समाजावरील एकप्रकारचा वचकही राहिला पाहिजे. काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलिस दलाबद्दल अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले, तर ते कायदा व सुव्यवस्थेला घातक आहे. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी याप्रकरणी संबंधित पोलिसांवर जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्याबाबत दक्षता घ्यावी. समाजानेही संयम बाळगायला हवा.बैठकीत काही कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून जाणीवपूर्वक टार्गेट केले जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. कृती समिती संघटीत असल्याने पोलिसांकडून असे धाडस केले जाणार नाही, असे आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. त्याबाबतचाही इशारा निवेदनाद्वारे पोलिसांना देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, कॉँग्रेसचे अय्याज नायकवडी, आयुब पटेल, विक्रम वाघमोडे, इम्रान जमादार, संजय लवटे, नितीनकुमार चव्हाण, कॉ. उमेश देशमुख, अजित दुधाळ, रवींद्र चव्हाण, नितीन कुरळपकर, सुधाकर गायकवाड, अमोल मोरे, रामभाऊ पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, शंभोराज काटकर, मयूर घोडके, गौरव कांबळे, आनंद देसाई, अमोल बोळाज, जयंत जाधव, फारुख संगतरास, जहीर मुजावर, अजित पाटील, धनंजय कोळपे, साहिल खाटीक, इलिहाज शेख, महालिंग हेगडे, अंकुर तारळेकर, सुनील कोळेकर आदी उपस्थित होते.पोलिसांना : इशाराआंदोलनामध्ये सहभागी असलेल्या एकाही कार्यकर्त्यावर पोलिसांनी कोणत्याही माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित पोलिस अधिकाºयांविरोधात कृती समिती कायदेशीर लढा देण्यास सज्ज आहे. त्यामुळे अशी दहशत माजविण्याचा प्रयत्नही पोलिसांनी करू नये, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.मुख्यमंत्र्यांना आरोपी करण्याची राष्टÑवादीची मागणीमिरज : सांगलीत आरोपीचा पोलिस ठाण्यात खूनप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्टÑवादीने प्रांताधिकाºयांकडे निवेदनाव्दारे केली आहे. पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळे यास ठार मारण्याचा पराक्रम करणाºया पोलिसांना जिल्ह्यातील शेकडो गुन्हे उघडकीस आणता आले नाहीत. आरोपी पोलिस अधिकारी व कर्मचाºयांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील या परिस्थितीची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनाही सहआरोपी करावे, या मागणीचे निवेदन प्रमोद इनामदार, प्रकाश इनामदार, सचिन कांबळे, सनातन भोसले, रमेश लोखंडे, मीरासाहेब शेख, मुन्ना कोकणे यांनी दिले.
पोलिस अधिकारी हटावची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 11:54 PM