इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील उरुण आणि शहर चावडीतील दोन्ही तलाठ्यांची बदली करावी, संगणकीय सात-बारा उताऱ्यामध्ये झालेल्या चुका पंधरा दिवसांत दुरुस्त करून द्याव्यात, झिरो तलाठ्यांची हकालपट्टी करावी, शासकीय दफ्तर चावडीमध्येच असायला हवे, अशा मागण्या करत शिवसेनेचे शहरप्रमुख शकील सय्यद यांनी या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन सय्यद यांनी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना दिले. या निवेदनात प्रलंबित नोंदी, वारस नोंदी, हिब्बानामाच्या नोंदी सत्वर कराव्यात, मोठ्या सर्व्हे नंबरमधील आणेवारी न जुळण्याचे कारण स्पष्ट करावे, दोन्ही चावडीमध्ये तलाठ्यांची उपस्थिती नसल्याने शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत, ऑनलाईन सात-बारातील चुकीच्या नोंदी सत्वर दुरुस्त करून मिळाव्यात, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी अॅड. अविनाश पाटील, दीपक जाधव, महंमद शेख, अशोक चव्हाण, संदीप पवार, तात्यासाहेब बामणे, शिवकुमार शिंदे, जहीरउद्दीन खान, प्रकाश पालकर, सूर्यकांत पाटील, विजय धुमाळे, डॉ. अभिजित रानमाळे उपस्थित होते.
फोटो - १००२२०२१-आयएसएलएम-शिवसेना न्यूज
इस्लामपूर येथे शिवसेनेच्यावतीने शकील सय्यद यांनी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना निवेदन दिले. यावेळी सूर्यकांत पाटील, अॅड. अविनाश पाटील, दीपक जाधव, संदीप पवार, जहीरउद्दीन खान, महंमद शेख उपस्थित होते.