सांगली : खासगी शिकवणी व्यवसायाला लघुउद्योगाचा दर्जा देण्याची मागणी क्लासचालकांनी केली आहे. कोचिंग क्लास टिचर्स फेडरेशन ॲण्ड सोशल फोरमची राज्यस्तरीय दोन दिवसीय बैठक सांगलीत शनिवारी व रविवारी झाली, त्यावेळी मागणी झाली. कोरोना काळात शिकवणी वर्गांना काही अटींसह परवानगी द्यावी, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या शिकवणी वर्गांवर बंदी घालावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही देण्यात आला.
पहिल्या दिवशी शिक्षकांची कार्यशाळा व दुसऱ्या दिवशी बैठक झाली. त्यानंतर पत्रकार बैठकीत फेडरेशनचे राज्याध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, शिकवणी वर्ग व्यवसायातील सर्वच तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. लॉकडाऊनमध्ये वर्ग बंद राहिल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने वर्गांना काही अटींसह परवानगी द्यावी. अनेक महाविद्यालयांतील प्राध्यापक व माध्यमिक शाळांतील शिक्षक खासगी वर्ग घेतात. अंतर्गत गुणांची भीती दाखवून मुलांना वर्गात येण्यास भाग पाडतात. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
बैठकीला सांगली जिल्हाध्यक्ष गणेश जोशी, राज्य सल्लागार प्रा. संजय कुलकर्णी, रफीक शेख, प्रताप गस्ते, यशवंत बोरसे, आनंद गंजीवाले, भीमराव धुळूबुळू, विशाल बरबुद्धे, वैजनाथ कानगुले, फैसल पटेल, निळकंठ पाटील, सुधार सावंत, नागेश कल्याणकर आदी उपस्थित होते.
चौकट
लघुउद्योगाचा दर्जा द्या
भुयार म्हणाले की, खासगी शिकवणी वर्गांना लघुउद्योगाचा दर्जा देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. समाजाची बौद्धिक गुणवत्ता वाढविण्याचे काम आम्ही करत आहोत, त्यामुळे मागण्यांचा गंभीर विचार शासनाने करावा. गेल्या सरकारच्या काळात शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिकवणी वर्गांसंदर्भात सविस्तर अहवाल शासनाला सादर केला होता, पण त्यातील शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही, याचाही विचार शासनाने करावा.