सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.
कोरोनामुळे थंड पिण्यावर लोकांनी नियंत्रण ठेवले असले तरी ऊन आणि गरम वातावरणामुळे त्यांचे पाय थंडपेय विक्री करणाऱ्या दुकानाकडे वळले आहेत. सामान्य लोकांचे लिंबू पाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक उपनगरात गाडीने प्रवास करतात. विशेषता सकाळी सांगलीतील विश्रामबाग, काँग्रेस भवन, एसटी स्टँड, टिळक चौक रोड, कुपवाड या भागातून लोक गावात येत असतात.
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे लोक अक्षरशः हैराण होत आहेत. त्यांचा जीव कासावीस होतो आहे. यामुळे लोक आता पहिल्यांदा शीतपेयांचे स्टॉलकडे वळतात. शीतपेयामध्ये थंड पाणी, लिंबूसोडा, इतर कोल्ड्रिंकची मागणी नेहमीपेक्षा २० टक्क्यानी वाढली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्थांपेक्षा शीतपेयाची जास्त मागणी असते.
काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, गाजर तसेच इतर फळांचा ज्युस पिण्यासाठी लोक गर्दी करत असल्याचे दिसत आहे, तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी,मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.
उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिलावर्ग तोंडाला स्कार्प बांधून प्रवास करणे पसंद करत आहेत. मार्च महिन्याचे तापमान साधारणपणे ३० ते ३२ डिग्रीच्या आसपास पोचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. यामुळे उन्हाळ्याच्या काहिलीने शीतपेयांची मागणी वाढली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्याचा परिणाम शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबू पाणी यांचे जास्त सेवन करावे. यात जीवनसत्त्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वृद्ध नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. त्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीजमधील पाणी घातक असून यामुळे कशाला विकार होऊ शकतात, बाहेरील अशुद्ध पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार, डोके दुखणे इत्यादी आजार होऊ शकतात. - डॉ. विजया सुवास पाटील, सांगली.