वाळवा : काेराेनाची स्थिती गंभीर असताना वाळवा येथे चिकून गुण्यासदृश आजाराने थैमान घातले आहे. हाता-पायांना सूज, तोंडाला सूज, अंगाला सूज व जडपणा यामुळे रुग्ण हैराण आहेत. अशातच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत जवळपास पन्नासहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे. गावातील रस्ते, गटारी स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे. डासप्रतिबंधक निर्मूलन फवारणी आवश्यक आहे. कचरा गोळा करून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावणेसुध्दा अत्यावश्यक आहे. मात्र घंटागाडीच येत नाही. तालुक्याचे गाव असूनही गावात कचराकुंड्यासुद्धा नाहीत. तुंबलेल्या गटारी, रस्त्यावरून वाहणारे पाणी, कचरा गाडी किंवा कचरा काेंडाळे नसल्याने गटारी किंवा रस्त्यावरच टाकला जातो. त्यामुळे अनेक रोगराईला वाळव्यात आमंत्रणच मिळत आहे.