बागणी : कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे बागणी (ता. वाळवा) येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.
मागील वर्षी बागणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांसाठी जिल्हा परिषद व राजारामबापू साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होतेे. यावेळी बागणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला असल्यामुळे परिसरातील लोकांना कोरोना हॉस्पिटलमधील बेडसाठी भटकावे लागत असून, विलगीकरण कक्ष व कोरोना सेंटर सुरू झालेले नाही. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी बेड मिळत नसल्याने व खासगी रुग्णालयातील महागडे उपचार परवडत नसल्याने परिसरातील लोकांना लवकर उपचार मिळावे यासाठी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात किंवा बागणी प्राथमिक केंद्रातील मोकळ्या जागेत कोरोना सेंटर उभे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोकवर्गणी व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षांचे प्रमुख नेते, परिसरातील संस्था यांच्या मदतीने कोरोना सेंटर उभारणी करण्याची मागणी होत आहे.