कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे एक जानेवारीपासून आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थ व महिलांकडून होत आहे. वाळवा तालुक्यातील बहुतेक सर्व गावांत आठवडी बाजार महिन्याभरापासून सुरू झाले आहेत. मग कामेरीतच बंद का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ जूनपासून येथील बाजार बंद आहे. त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी व सायंकाळी भरणारी भाजीपाला विक्रीसाठीची मंडई पण दीर्घ काळ बंद होती. ती महिन्याभरापासून सुरू झाली आहे. मात्र, आठवडी बाजार सुरू नसल्याने बहुतेक सर्वच भाजीपाला, कांदे, बटाटे विक्रेते चढ्या दराने मालाची विक्री करत आहेत, अशी तक्रार ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समितीकडे वारंवार केली आहे. त्यांनी सूचना देऊनही व्यापारी दाद देत नसल्याने शुक्रवारचा आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.