मिरज : कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. यामुळे या मार्गावर आणखी एक कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.मिरज व परिसरातील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असल्याने रेल्वेने या गाडीस शयनयान व वातानुकूलित बोगीची संख्या वाढविल्याने गेले वर्षभर सुरू असलेल्या कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसला मोठे उत्पन्न मिळत आहे. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या मार्गावर सकाळ सत्रात आणखी एक कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी इंटरसिटी एक्स्प्रेस व परतीच्या प्रवासासाठी दुपारी कलबुर्गी-मिरज-कोल्हापूर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आहे.मिरज, सांगली, कोल्हापूर, कोकण व कर्नाटकातून पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर याठिकाणी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांना सकाळी कोल्हापूर किंवा मिरजेतून जाणारी व परतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून दुपारी सुटणारी गाडी सोयीची होणार आहे.सध्या सुट्ट्यांचा व लग्नसराईचा हंगाम सुरू होत असून, या काळात गाडी सुरू झाल्यास प्रवाशांना सोयीचे होईल. ही गाडी कोल्हापुरातून सोडणे शक्य नसल्यास मिरजेतून मिरज-कलबुर्गी इंटरसिटी एक्स्प्रेस सोडण्यात यावी. तेही शक्य नसल्यास मिरज-कुर्डूवाडी डेमू गाडीचा कलबुर्गीपर्यंत विस्तार करून मिरज-कलबुर्गी डेमू सोडण्याची मागणी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पंडितराव कराडे, स्थानक अधीक्षक जे. आर. तांदळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोल्हापूर-मिरज कलबुर्गी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 13:41 IST