सांगली : मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे.देशभरातील तीर्थक्षेत्रे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम सध्या सुरू आहे. राज्यात नुकतीच मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. प्रवासी, भाविक आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद या गाड्यांना मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सोडण्याची मागणी पाटील यांनी पत्राद्वारे केली.कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात. विशेषत: मुंबई, पुण्याहून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विमानानेही भाविक येत असतात. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्यास त्यांची अधिक सोय होणार आहे. लोकभावनेचा विचार करून ही एक्स्प्रेस सुरू केली जाईल, अशी अपेक्षा असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.ही गाडी सुरू झाल्यास कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल, शिवाय सांगली, मिरजेतील प्रवाशांनाही सर्व सुविधायुक्त वेगवान प्रवास करता येणार आहे. सध्या कोल्हापूर-मुंबई मार्गावर महालक्ष्मी आणि कोयना या दोनच गाड्या धावतात. वंदे भारतच्या निमित्ताने आधुनिक गाडी उपलब्ध होणार आहे.
मुंबई-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी, मंत्री चंद्रकांत पाटलांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 5:55 PM