झविटा : खानापूर तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व सोयाबीनच्या घोळामुळे शेतकरी आजही हतबल झाला आहे. अशातच सध्या सोयाबीनची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना खरीप हंगामात जबरदस्तीने इतर पिकांकडे वळविण्याचा घाट कृषी अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्या खानापूर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने बदली करावी; अन्यथा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.
ते म्हणाले, शासनाकडून तालुका कृषी खात्याकडे येणाऱ्या योजना विविध प्रकारचे बियाणे व खते यांचा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा होताना दिसत नाही. उलट काही स्थानिक पातळीवरील गावपुढाऱ्यांना मॅनेज करून या कृषी योजना तेथेच मुरविण्याचा प्रकार कृषी खात्याकडून सुरू आहे.
गेल्यावर्षी अग्रणी नदीला आलेल्या महापुरात झालेल्या नुकसानीबाबत एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. या सर्व प्रकाराकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळू शकला नाही. याचा विचार करून खानापूर तालुक्यात असलेले निष्क्रिय तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार यांची तातडीने अन्यत्र बदली करून त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष व शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांची बदली न झाल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.