सांगली : पिंजरा पद्धतीने मासेमारी करणाऱ्या शेतकरी व व्यावसायिकांची एका वर्षाची ठेक्याची रक्कम माफ करण्याची मागणी ‘पिंजरा पद्धत’ मत्स्यसंवर्धन वेल्फेअर असोसिएशनने केली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संघटनेने मत्स्य व्यवसाय आयुक्तांना यासंदर्भातील निवेदन पाठविले आहे. अध्यक्ष विजय कणसे व सचिव गणेश निकम यांनी सांगितले की, राज्यभरात हजारो शेतकरी व मच्छिमार व्यावसायिक पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसाय करतात. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे त्यांना प्रचंड नुकसानीला व संकटांना तोंड द्यावे लागले. व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला.
त्याची दखल घेत मत्स्य व्यवसाय विभागाने ठेकेदारीची रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. पण शेतकरी अद्याप सावरलेला नसल्याने पूर्ण वर्षभराची ठेक्याची रक्कम माफ करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे तसे न केल्यास मत्स्य व्यावसायिक संकटाच्या गर्तेत जातील, मत्स्य संवर्धन ठप्प होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
चौकट
लॉकडाऊनमुळे संकटांची मालिका
गेल्या आठ-नऊ महिन्यांत या व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे. खाद्य न मिळाल्याने मत्स्यबिजे नष्ट झाली. बाजारपेठा बंद असल्याने उत्पादनही फेकून द्यावे लागले. या स्थितीत वर्षभराचे शुल्क माफ केल्यास व्यावसायिकांना दिलासा मिळेल, असे संघटनेने म्हटले आहे.
---------
-----