गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे तसेच मागील एप्रिल महिन्यात सोडलेल्या टेंभूच्या पाण्यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील पाणी साठा मार्च अखेर टिकून राहिला. मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने जोर केला आहे. रोजचे तपमान ३९ अंशापर्यंत जात आहे. परिणामी बहुतेक बंधारे कोरडे पडले आहेत. पाझर तलावातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. विहिरी, कूपनलिकांची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.
सध्या द्राक्ष बागांच्या एप्रिल छाटणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. द्राक्ष बागांना पाण्याची गरज आहे. इतर बागायत क्षेत्रातही वाढ झाली आहे. शिवाय पाण्याच्या आशेवर उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष टेंभूच्या पाण्याकडे लागले आहे.
अग्रणी नदीवरील गोरेवाडीपासून करंजेपर्यंतचे सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या सर्व स्रोत्रात कमालीची घट झाल्याने सर्वांना टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या पाण्याची प्रतीक्षा लागली आहे.