फळविक्रेत्यांकडून जादा दराने फळांची विक्री
सांगली : पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधारी यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन जाहीर केले होते. यामुळे अनेक फळविक्रेत्यांनी फळेच विक्रीसाठी आणली नव्हती. याचाच काही फळविक्रेत्यांनी गैरफायदा घेत शंभर रुपयांची सफरचंद २२० रुपये किलोने विक्री केली आहे. याचप्रमाणे अन्य फळांचे दरही चढे लावले होते.
पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग
सांगली : उन्हाळी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी पूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळेही मशागतीच्या कामात अडथळा येत आहे. मजुरांना घराच्या बाहेर पडता येत नाही. पण, कोरोनावर मात करण्यासाठी आठवडाभर मशागतीची कामे थांबली तर चालतील, अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.
लॉकडाऊनमध्ये भुरट्या चोऱ्या
सांगली : सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. तरीही भुरट्या चोऱ्या थांबलेल्या नाहीत. काही घरे बंद असल्याचे पाहून परिसरातील साहित्यावर भुरटे चोर डल्ला मारत आहेत. या भुरट्या चोरांना पोलिसांनी धडा शिकवण्याची गरज आहे, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.