लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील बेघरांना घरकुले द्यावी, या मागणीसाठी जिल्हा निवारा संघाच्यावतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली. संघाचे अध्यक्ष काॅ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी नगरअभियंता बी. आर. पांडव यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेच्यावतीने आंदोलकांना लेखी पत्रही देण्यात आले. यात १३१ लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली असून, त्यांना वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेत त्वरित घरकुले देण्यात येतील. उर्वरित लाभार्थीनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना लाभ देण्यात येईल. मंगलमूर्ती कॉलनीमध्ये कृषी अधिकाऱ्याने आरक्षित जागेवर बांधलेल्या बेकायदेशीर घराबाबत नगररचना विभागाकडून चौकशी सुरू आहे. तसेच सावंत प्लॉट येथील रस्ता व गटारीबाबत प्रभाग समिती एकमार्फत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही देण्यात आली. संघाचे अध्यक्ष पुजारी म्हणाले की, महापालिकेच्या मालकीचे भूखंड हडप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. कायद्यामधील तरतुदीनुसार मोकळ्या भूखंडासंदर्भात धोरण नक्की करणे आवश्यक आहे. हे मोकळे भूखंड गरीब कुटुंबियांना घरबांधणीसाठी देण्यात यावेत, अशी मागणी केली. या आंदोलनाचे नेतृत्व वर्षा गडचे, संतोष बेलदार, नंदिनी कामते, सुरेश सुतार, सुमन शिंदे, लता लोखंडे, हवाबी मलापुरे, सलीम मुजावर, मोहसीन मुल्ला यांनी केले.