कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे ड्रोनद्वारे ऊस पिकावर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कामेरी (ता. वाळवा) येथील सुनील भीमराव पाटील यांच्या ३५ गुंठे उसावर ४ मिनिट ३७ सेकंदांत औषध फवारून झाले. यासाठी एकरी ६०० च्या दराने ५२५ रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच फक्त ५ मिनिटांत १ एकर फवारणी होऊ शकते. याची उपस्थित शेतकरी बांधवांना खात्री पटली.
राजारामबापू पाटील कारखान्याच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. एक एकर फवारणीस एकूण दहा लिटर औषध लागते. या ड्रोनचे वजन १५ किलो आहे. द्रव स्वरूपातील औषध १० लिटर उचलू शकते. याच्याबरोबर एकूण ५ बॅटऱ्या आहेत. पूर्ण चार्जिंग केल्यास दिवसात किमान ४० एकर फवारणी होऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी राजारामबापू ग्रुप ऑफ कंपनीचे उपाध्यक्ष सुभाष जमदाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवानेते प्रतीक पाटील, कामेरी येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष रणजित पाटील, सुनील पाटील, सतीश गायकवाड, अतुल कदम, मोहन आजमणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो : १६ कामेरी १
ओळी : कामेरी (ता. वाळवा) येथे राजारामबापू कारखान्यातर्फे ड्रोनद्वारे ऊस पिकावर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.