शिराळा : दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी शिराळा तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सर्वपक्षीय शेतकरी समन्वय समितीने तहसीलदार गणेश शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी प्रशिक्षणार्थी भाप्रसे अधिकारी आरोशी सिंग उपस्थित होत्या.
आंदोलनामध्ये राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, शिराळा तालुका कामगार परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) आदी संघटना आणि पक्ष सहभागी झाले होते. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे, तीनही कायदे मागे घेण्यात यावेत. घरगुती गॅस दरवाढ आणि पेट्रोल, डिझेलमधील दरवाढ मागे घ्यावी. नवीन कृषी कायद्यांनी बाजार समिती उद्ध्वस्त होणार आहेत. यामुळे शेतकरीदेखील उद्ध्वस्त होऊन भांडवलदार शिरजोर होणार आहे. अन्यायकारक तिन्ही कायदे रद्द केले पाहिजेत. वीज वितरण केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे. यावेळी विजयराव नलवडे, धनाजी गुरव, ॲड रवी पाटील, ॲड. भगतसिंग नाईक, विजयकुमार जोके आदींनी कृषी कायद्याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. प्रा. विजय गायकवाड यांनी महात्मा फुले यांची शेतकरीविषयक भूमिका विशद केली. यावेळी महात्मा फुले आणि गाडगेबाबा यांच्या वेशामध्ये आलेले कार्यकर्ते हे या आंदोलनाचे आकर्षण ठरले.
या लाक्षणिक धरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयराव नलवडे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. रवी पाटील, चंद्रकांत निकम, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष हिरूगडे, अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजयकुमार जोखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम पाटील, उपनगराध्यक्ष विजय दळवी, नगरसेवक मोहन जिरंगे, मारुती रोकडे, महादेव माने, मोहन जिरंगे, सागर घोलप, कीर्तीकुमार पाटील, विश्वास कदम, अमर पाटील, प्रा. विजय गायकवाड, सुनील कवठेकर, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.