सांगली : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? हजारो तरुण मुला मुलींचे भवितव्य घडविणार्या क्रीडांगणबाबत उदासिनता का? असा सवाल करत मंगळवारी मदनभाऊ युवा मंचाच्यावतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले
. या क्रीडांगणात थोड्याशा पावसानेही तळ्यासारखे पाणी साचते. मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. संध्याकाळी येथे तळीरामांचा अड्डा असतो. याठिकाणी पाण्याचा कायमस्वरुपी निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच येथे संध्याकाळी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण सुस्थितीत करून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील गर्दी कमी करता येईल.
प्रशासन व सत्ताधार्यांना सुसज्ज केबीन पाहिजे, वातानुकूलित गाड्या हव्यात, हा सर्व खर्च जनतेच्या पैशातून करत असून महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा देण्यासाठी मात्र त्यांच्या हाताला लकवा मारतो. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पूर्णक्षमतेने सुसज्ज होत नाही तोपर्यंत युवा मंच्याकडून वारंवार आवाज उठवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी मंचचे अमोल झांबरे, तौफिक बिडीवाले, शेखर पाटील, अवधूत गवळी, शानुर शेख, शरद गाडे, जयराज बर्गे, संतोष कुरणे, महेश पाटील, महेश कोळी, संकेत आलासे उपस्थित होते.