फोटो १० संतोष ०३
सांगली व मिरजेत शासकीय रुग्णालयांत परिचारिकांनी बदलीच्या धोरणांविरोधात निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय व मिरजेतील शासकीय रुग्णालयात परिचारिकांनी बदल्यांच्या धोरणाला विरोध म्हणून काळ्या फिती लावून काम केले. निदर्शनेही केली. निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
राज्यभरात सात हजार परिचारिकांच्या बदल्यांचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. बदलीसाठी १० जिल्ह्यांतील कोणतेही ठिकाण २४ तासांत कळविण्यास सांगितले आहे. गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने त्याला तीव्र विरोध केला आहे. परिचारिकांची सेवा अत्यावश्यकमध्ये मोडत असल्याने त्यांना बदली धोरणातून वगळण्याची मागणी संघटनेने केली आहे. फक्त विनंती बदल्या कराव्यात, असे सुचविले आहे. बदल्यांच्या माध्यमातून शासन भ्रष्टाचाराला उत्तेजन देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सांगलीत संघटनेच्या अध्यक्षा शैलजा सावर्डेकर, उपाध्यक्ष दत्ता ढमाले, कार्याध्यक्ष अजित शिंदे, सोफिया ओहोळ, शहाबाज पटेल, जयश्री दबडे, प्रशांत कोळी, विजय पाटील, मिथुन पवार, विजय देशमुख, शालोमन कुरणे, हितेश थोरात, अल्ताफ नदाफ, ज्योती टिटला आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मिरजेत अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे, वरुण सत्याचारी, विवेक कुरणे, मेघा कदम, जितेंद्र अडसूर, प्राची वाघमारे आदींनी नेतृत्व केले. सावर्डेकर यांनी सांगितले की, बदल्यांच्या निर्णयाने परिचारिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. ऐन कोविड काळात बदल्यांमुळे रुग्णसेवा विस्कळीत होईल. वयाची चाळिशी पार केलेल्या परिचारिकांसाठी बदली त्रासदायक ठरणार आहे.
चौकट
कोविड सेवा विस्कळीत होण्याची भीती
प्रतिभा हेटकाळे म्हणाल्या की, परिचारिकांचा कार्यालयातील कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी संबंध येत नाही, त्यामुळे एकाच ठिकाणी राहिल्याने हितसंबंध निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. रुग्णालयात प्रशासकीय कामासाठी वेगवेगळ्या विभागात नियमित बदल्या होतच असतात. शासनाने दहा जिल्ह्यांत कोठेही बदलीचा निर्णय घेतल्याने कोविड सेवेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे निर्णय मागे घ्यावा.