सांगली : त्रिपुरा व अन्य राज्यांमध्ये झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ गुरुवारी सांगलीत पुरोगामी संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मनुवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला.येथील स्टेशन चौकात सकाळी आंदोलन करण्यात आले. मुर्दाबाद मुर्दाबाद आरएसएस मुर्दाबाद, जिंदाबाद जिंदाबाद लेनीन जिंदाबाद, जय जिजाऊ, जय शिवराय, हम से जो टकरायेगा, मिठ्ठी मे मिल जायेगा, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शंकर पुजारी म्हणाले की, त्रिपुरा येथील विजयानंतर भाजप व संघाच्या मनुवादी कार्यकर्त्यांनी लेनीन यांचा पुतळा पाडला. त्याठिकाणी अनेक पुरोगामी चळवळीतील नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले केले. संपूर्ण राज्य त्यांनी वेठीस धरले.
सांगलीत स्टेशन चौकात गुरुवारी सकाळी पुरोगामी संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून देशात अशा प्रवृत्तींचा उपद्रव वाढला आहे. महापुरुषांच्या पुतळ््यांची विटंबना करतानाही त्यांना भिती वाटत नाही. त्यामुळे या प्रवृत्तींना आता रोखण्याची आवश्यकता आहे. आम्ही त्यांच्या या कृत्याचा निषेध करीत आहोत.राजन पिराळे म्हणाले की, हिंदुत्ववादाच्या नावाखाली दंगे भडकविण्याचे व समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप व आरएसएसचे लोक करीत आहेत. संपूर्ण देशभरात महापुरुषांच्या पुतळ््यांची विटंबना करून अशांतता पसरविण्याचा विचार भाजप सरकार करीत आहे. त्यांच्या या कृत्याचे उत्तर जनताच त्यांना देईल.
आंदोलनात अॅड. के. डी. शिंदे, बाळासाहेब पाटील, लताताई देशपांडे, बिराज साळुंखे, संजय देसाई, अॅड. तेजस्वीनी सूर्यवंशी, अॅड. अजित सूर्यवंशी, डॉ. नामदेव कस्तुरे, सदाशिव मगदुम, राहुल थोरात, रेहाना शेख, प्रवीण कोकरे, चंद्रकांत वंजाळे आदी सहभागी झाले होते.