लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल गिरीश कुबेर यांच्याविरोधात शनिवारी संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने निदर्शने करण्यात आली. राज्य शासनाने या पुस्तकाच्या प्रती जप्त करून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.
गिरीश कुबेर लिखित रिने इसेन्स स्टेट या पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक लिखाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिंदे म्हणाले की, राज्यातील जनता कोरोना महामारीचा मुकाबला करीत असताना गिरीश कुबेर यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणारे शिवभक्तांच्या व संभाजी भक्तांच्या भावना दुखावणारे लिखाण केले. त्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. कुबेर यांच्या पुस्तकाच्या प्रती जप्त करून त्यावर बंदी घालावी. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या केली. यावेळी नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे, प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रसाद रिसवडे, अमर पडळकर, अविनाश मोहिते, संतोष पाटील, राजू जाधव, प्रदीप निकम, तानाजी शिंदे, अमित सूर्यवंशी, संजय जाधव, अशोक पाटील, निखिल सावंत, रामभाऊ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.