कडेगाव : शिरसगाव तालुका कडेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी व विद्यमान सरपंच संभाजी रामचंद्र मांडके यांचेसह येथील शेतकरी बाबासो एकनाथ मांडके यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे. सरकारने उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा. आम्हाला भीक नको घामाचे दाम हवे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शिरसगाव येथील संभाजी मांडके व बाबासो मांडके या दोन शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सम्मान योजनेचा लाभ नाकारत असल्याचे तसेच अन्य हक्काच्या मागण्यांबाबतचे निवेदन कडेगावचे नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांचेकडे दिले आहे .या दोन्ही शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आम्हाला लाभ नको आहे आहे असे सांगत बळीराजाला तुटपुंजी मदत देणे हा त्याचा सन्मान आहे का, असा सवाल निवेदनाद्वारे केला आहे. सरकारची तुटपुंजी मदत आम्हाला नकोे, आमच्या शेतीमालाला रास्त भाव हवा आहे , आमच्या कष्टाची किंमत आम्हाला मिळायला हवी, भीक नको हक्क द्या असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान आम्ही दोघेही शिरसगाव येथील अल्पभूधारक शेतकरी खातेदार असून आम्ही योजनेच्या सर्व निकषात पात्र आहे, परंतु हमीभाव तसेच हक्काच्या मागण्यांसाठी आम्ही ही मदत नाकारत असल्याचे संभाजी मांडके व बाबासो मांडके हे अन्य शेतकरी बांधवाना सांगुन आपली भूमिका मांडत आहेत.