नरेंद्र रानडे - सांगली सांगली शहरातील विविध रोपवाटिकांच्या दिशेने सध्या वृक्षप्रेमींची पावले वळत आहेत. शोभेची झाडे, बोन्साय आणि परसबागेत लावण्यासाठी पाच ते सहा फुटी झाडांना वृक्षप्रेमी पसंती देत आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागानेदेखील आमराईमध्ये पुढील वर्षीसाठी पाच हजार रोपांची लागवड करण्यास प्रारंभ केला आहे.शहर परिसरात सुमारे दहा रोपवाटिका आहेत. त्या सर्वच रोपवाटिकांमधून नानाविध प्रकारची रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. भर पावसातही आकर्षक रोपे घेण्यासाठी वृक्षप्रेमी गर्दी करत आहेत. सुमारे दोनशेवर शोभेची झाडे सध्या विक्रीस उपलब्ध आहेत. त्यापैकी मॅण्डेविला, अलमंडा, बदकवेल, रानजाई, कृष्णकमळ, गणेशवेल, संक्रांतवेल, इफोरबिया, टिकोमा, पेंटास, पिटोनिया आदी रोपांना मागणी आहे. बंगल्याभोवती लावण्यासाठी झुडूपवर्गीय एक्सोरा, फायकस, आरेका पाम, बांबू आदी रोपांची विक्री होत आहे. मागील वर्षापासून मोठ्या कुंडीमध्ये झाडे लावण्याकडे कल वाढत चालला आहे. साहजिकच पाच ते सहा फूट उंचीपर्यंतच्या रोपांना मागणी आहे. यामध्ये ताम्हण, बहावा, गुलमोहर, चाफा, कांचन, साठवण, बकुळी आदींचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी घराच्या सभागृहात लावण्यासाठी कॅक्टसची रोपे घेतली जात होती; परंतु सध्या मात्र कॅक्टसची मागणी अत्यंत कमी झाली आहे. त्याऐवजी इतरांच्या तुलनेत महाग असणाऱ्या आणि सुमारे शंभर वर्षे आयुष्य असणारी बोन्साय झाडे लावण्याकडे अनेकांचा कल आहे. भारतीय रोपांप्रमाणेच अॅडेनियम, टॅबुबिया, चाफा आदी विदेशी रोपेदेखील काही रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे गुलमोहर, कांचन, रेन-ट्री आदी प्रकारच्या पाच हजार रोपांची आमराईत लागवड करण्यात येत आहे. यंदा १५०० रोपे विविध ठिकाणी लावण्यात आली आहेत.
वृक्षप्रेमींची पावले रोपवाटिकेकडे!
By admin | Published: July 22, 2014 11:10 PM