शिराळा : उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.के. मोमीन व ग्रामीण रुग्णालय, कोकरूडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सलमा इनामदार यांच्या कामाची चौकशी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. या वेळी त्यांनी कोविड कालावधीत कामामध्ये हालगर्जीपणा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
शिराळा तहसीलदार कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत डॉ. अभिजित चौधरी बोलत होते. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रांताधिकारी ओमकार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील उपस्थित होते. या बैठकीत डॉ. चौधरी यांनी उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णांना सर्व औषधे उपलब्ध असताना बाहेरून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी देण्याविषयी डॉ. मोमीन यांच्याविरुद्ध तक्रारी आल्या आहेत. कोकरूड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. इनामदार यांच्याबाबत कोरोनाची पाहिली लाट संपल्यावर अडीच महिन्यांत कोणत्याही आजाराचा एकही रुग्ण न तपासणे आदी तक्रारी आहेत. ही गंभीर बाब आहे, असे सांगून त्यांच्या कामाची चौकशी करण्याचा आदेश दिला.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, ज्या गावांमध्ये कोविड रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा. ग्राम दक्षता समित्यांनी सक्षमपणे काम करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, साहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील हे रात्री उशिरापर्यंत उपजिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तपासणी करत होते. या वेळी साहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, साहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने, डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ. मनोज महिंद आदी उपस्थित होते.
चौकट
शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. ज्या विभागांमध्ये कमतरता जाणवल्या, त्या तातडीने पूर्ण कराव्या तसेच रुग्णाच्या नातेवाइकांना दिवसातून दोन वेळा रुग्णांवर केलेल्या उपचारांची माहिती देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी डॉक्टरांना दिल्या.