सांगली : रामपूर (ता. जत) येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास योजनेच्या (दलित वस्ती सुधार योजना) निधीतील अनियमितताप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
दलित वस्ती निधीतील अनियमितताप्रकरणी तत्कालीन सरपंच, गामसेविका, अभियंता, गटविकास अधिकारी, ठेकेदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस सादर झाला आहे. या अहवालानुसार तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य नितीन शिवशरण यांनी केली आहे. दलित वस्तीच्या कामासाठी संबंधित ठेकेदारास १२ मे २०१७ ते १३ जून २०१७ या कालावधित सात लाख रुपये प्रथम दिले आहेत. मात्र तत्कालीन अभियंता यांचा २२ फेबुवारी २०१८ चा अहवाल, फोटो पाहिले तर रक्कम दिल्यानंतर सहा महिन्यांनीही काम अपूर्ण असल्याचे आढळले. काम पूर्ण करण्यापूर्वीच ठेकेदारास बिल दिले असल्याने त्याला सरपंच व ग्रामसेवक जबाबदार आहेत. त्यांच्यावर संयुक्तरित्या जबाबदारी निश्चित करावी, असे चौकशीमध्ये सुचवण्यात आले आहे.
ठेकेदारास अभियंत्यांच्या मूल्यांकनाशिवाय सात लाख रुपये देण्यात आले आहेत. मोजमाप पुस्तिकेतील प्रथम धावते बिल दि. १७ जून २०१७ रोजी रेकॉर्ड केले आहे. तत्पूर्वीच म्हणजे १३ जून २०१७ पूर्वीच ठेकेदारास सात लाख रुपये देण्यात आले आहेत. तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी कामाच्या देयकाची रक्कम गटविकास अधिकारी व ग्रामसेवक या संयुक्त खात्यावरून अदा करण्यापूर्वी उपअभियंता कार्यालयाकडून मूल्यांकन प्राप्त करून घेतलेले नाही. हीसुध्दा अनियमितताच असून, तत्कालीन गटविकास अधिकाºयांवरही जबाबदारी निश्चित करावी, असे अहवालात म्हटले आहे.
अहवाल महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदेस प्राप्त झाला आहे. मात्र कारवाईस टाळाटाळ केली जात असल्याने शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेतली असता, त्यांनी विभागीय चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
ठेकेदारावर कारवाईची शिफारसप्रत्यक्ष मूल्यांकन व स्थळ पाहणी अहवालात ७३ हजार २३९ रुपयांची तफावत आढळून येत आहे. ही रक्कम तत्कालीन उपअभियंता बी. एस. पाटील, शाखा अभियंता आर. डी. पाटील यांच्याकडून वसूल करण्यात यावी, संबंधित ठेकेदार सागर रंगराव पवार (रा. रामपूर, ता. जत) यांनी काम अपूर्ण ठेवल्यामुळे व ते मुदतीत पूर्ण न केल्यामुळे त्यांच्याविरोधात दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.