सांगली : कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ बदलल्याने हजारो प्रवाशांची ससेहोलपट सुरू आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील प्रवासी वेठीस धरले गेले आहेत. प्रवाशांच्या व प्रवासी संघटनांच्या तक्रारीला परप्रांतीय अधिकारी दाद देत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या हक्काच्या गाडीला परप्रांतीय अधिकाऱ्यांच्या तालावर धावावे लागत आहे.
कोरोनापूर्वी ही एक्स्प्रेस दुपारी ३.३० वाजता कोल्हापुरातून सुटायची. मिरजेत पावणेपाच व सांगलीत पाच वाजता यायची. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, मिरजेतील हजारो नोकरदारांना या गाडीने घरी परतता येत होते. कोरोनानंतर वेळ बदलली असून, कोल्हापुरातून दुपारी पावणेतीन वाजता सोडली जात आहे. मिरजेत पावणेचार व सांगलीत चार वाजताच येऊ लागली आहे. त्यामुळे नोकरदारांना गाडी मिळेना झाली आहे. साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी या गाडीनंतर रात्री उशिरापर्यंत अन्य कोणतीही गाडी नाही. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
एक्स्प्रेसची वेळ पूर्ववत करावी यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला आहे; पण त्याची दखल घेण्यात आलेली नाही. पुणे विभागावर नियंत्रण असणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहारच्या अधिकाऱ्यांना मराठी प्रवाशांच्या त्रासाची पर्वा नाही. त्यांच्या मनमर्जीवर गाडी धावत आहे. यामध्ये प्रवासी आणि रेल्वे या दोहोंचे नुकसान होत आहे.
खासदारांनाही सोयरसूतक नाहीपुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत या विषयावर अनेकदा चर्चा झाली आहे. वेळ बदलू असे बैठकीत सांगणारे अधिकारी नंतर मात्र पाठ फिरवतात. त्रस्त प्रवाशांनी खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापुरातील सर्व आमदार, खासदारांना निवेदने दिली आहेत. पण, रेल्वेमंत्र्यांपुढे वेळेत बदलासाठी यापैकी कोणीही आग्रह धरलेला नाही. जणू रेल्वेचे काम आपले नव्हेच याच मनोभूमिकेत खासदार वागत आहेत.
पुण्यात बसलेले परप्रांतीय अधिकारी प्रवाशांची सोय न पाहता मनमानी करतात. त्यांना लोकप्रतिनिधींचाही धाक राहिलेला नाही. महाराष्ट्र एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी हजारो प्रवाशांनी करूनही दाद दिली जात नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. - संदीप शिंदे, रेल्वे प्रवासी सेना