सांगली : घरफोडी, खूनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विटा (ता. खानापूर) येथील सागर पवार यासह टोळीतील आठ जणांना सांगली व सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई केली.
आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण व उत्सव शांततेत पार पडावेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात मोहिम उघडली आहे. विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सागर पवार टोळीने दहशत निर्माण केली. टोळी प्रमुख सागर अरविंद पवार (वय २६, रा. आयटीआय कॉलेजजवळ, विटा), प्रशांत ऊर्फ चिंगळ्या विजय गायकवाड (२३, रा. विवेकानंदनगर, विटा), पवन गजानन खंदारे (२०, रा. सूर्यनगर, विटा), राज किरण जावीर (१९, रा. गार्डी, ता. खानापूर), रितेश विकास खरात (१९, रा. साळशिंगे रोड, विटा), सोहन माणिक ठोकळे (३१, रा. जुना वासुंबे रोड, विटा), मयुरेश मनोहर अदाटे (२१, रा. मधुबन हॉटेलजवळ, विटा), रोहीत किरण जावीर (२१, रा. गार्डी, ता. खानापूर) या आठ टोळीविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
०१८ व २०२२ या कालावधीत घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे, गर्दी जमवून जीवे मारण्याचे उद्देशाने गंभीर दुखापत करणे, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान, शिवीगाळ, दमदाटी, असे गुन्हे दाखल आहेत. या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय अधिकारी पद्मा कदम यांनी चौकशी करून अहवाल दिला. टोळीविरुध्द दाखल गुन्हे, सद्यस्थितीचा अहवाल विचारात घेऊन सांगली व सातारा जिल्हयातून २ वर्षासाठी तडीपारी आदेश देण्यात आला.
या कारवाईमध्ये एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक निरीक्षक प्रशांत चव्हाण, काॅन्टेबल सिध्दाप्पा रुपनर, दीपक गट्टे, अण्णा मोहिते यांनी भाग घेतला.