सांगली: आष्टा येथील तौसिफ शेख टोळीतील दोघांना सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे निर्देश पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले. या टोळीवर खूनाचा प्रयत्न करणे, विनयभंग यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हद्दपार केलेल्यामध्ये तौसिफ उर्फ मामू नजीर शेख ( वय २८, रा. कोटभाग, ता. वाळवा ) आणि शेरुभैय्या मन्सुर चाऊस (वय २६ रा. माळभाग, ता. वाळवा ) या दोघाचा समावेश आहे. २०१७ ते. २०२३ या कालावधीत टोळीविरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने खूनाचा कट रचणे, हत्यारानिशी खूनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी आदींचा समावेश होता. या टोळीविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव आष्टा पोलीस ठाण्याने पोलीस मुख्यालयाकडे पाठविला होता.
हा प्रस्ताव पोलीस अधिक्षक डॉ. तेली यांनी इस्लामपूर येथील उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांच्याकडे चौकशीकरिता पाठविला होता. त्यांनी चौकशी अहवाल दिल्यानंतर डॉ. तेली यांनी टोळीतील दोघांविरोधात हद्दपारीची कारवाई केली. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक मनिषा कदम, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आदी कार्यवाहीत सहभाग घेतला.