सांगली : येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह के्रडिट सोसायटीने ९९ लाखाची ठेव परत न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट (रा. परळी वैजनाथ, जि. बीड) यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याप्रकरणी ठेवीदार इंद्रजित रामचंद्र पाटील (रा. नागाव कवठे, ता. तासगाव) यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. शुभकल्याण सोसायटी हंबरगाव (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील आहे. सोसायटीने ठेवीदारांना ६ ते १७ टक्के व्याजाचे आमिष दाखविले होते. या सोसायटीत पाटील यांनी ९८ लाख ९९ हजार ९७८ रुपयांची ठेव ठेवली होती. ठेवीची मुदत संपल्यानंतरही सोसायटीने ही ठेव परत केली नाही. याप्रकरणी पाटील यांनी सोसायटीच्या अध्यक्षासह संचालक व कर्मचाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. शाखेचे निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी या प्रकरणातील मुख्य संशयित सोसायटीचे अध्यक्ष दिलीप आपेट यांना मंगळवारी परळी वैजनाथ येथून अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. शुभकल्याण सोसायटीत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पिसाळ यांनी केले आहे.