सहदेव खोत पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील युवा उद्योजक विजय शेळके यांनी आपले वडील छगन रायसिंग शेळके यांच्या स्मरणार्थ गावात जन्माला आलेल्या मुलींच्या नावे प्रत्येकी सात हजार एक रुपयांची ठेव पावती ठेवली. भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या हस्ते या पावत्यांचे वितरण करण्यात आले. शेळके यांच्या या अनोख्या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे.पुनवत येथील विजय शेळके हे मुंबईमध्ये उद्योजक म्हणून काम करतात. गावच्या सार्वजनिक उपक्रमातही त्यांचा मोठा सहभाग असतो. गावात मुलींची कमी होणारी संख्या लक्षात घेता विजय शेळके यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभरात कोणत्याही कुटुंबात जन्माला आलेल्या पहिल्या मुलीला ७००१ रुपये देण्याचे निश्चित केले. त्याला अनुसरून गेल्या वर्षभरात पुनवत, खवरेवाडी, माळवाडी या ठिकाणी जन्माला आलेल्या पहिल्या मुलीच्या नावे ठेव पावतीसाठी पैसे वितरीत करण्याचा कार्यक्रम घेतला.यानिमित्ताने त्यांनी ग्रामीण कथाकार हिंमत पाटील यांच्या कथाकथनाचा कार्यक्रमही आयोजित केला. गावातील सुमारे १० लाभार्थी मुलींसाठी या रकमेचे वाटप भाजप नेते सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी के. डी. पाटील, रघुनाथ शेळके, सरपंच नानासाहेब शेळके, उपसरपंच अभिजित शेळके, अशोक शेळके, अभयसिंह शेळके, किरण शेळके, कवी रमजान मुल्ला, शिवाजी शेळके, बाबासाहेब वरेकर, सागर पाटील, राहुल शेळके, शिवाजी उपलाने, रोहित शेळके, भीमराव कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे तसेच तिच्या उज्वल आयुष्यासाठी थोडाफार आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम पुढे अविरतपणे चालू राहील. - विजय शेळके, पुनवत