Sangli Politics: अजित पवारांचा दौरा अराजकीय, पण हालचाली राजकीयच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 11:31 AM2024-02-06T11:31:04+5:302024-02-06T11:31:38+5:30
काँग्रेस नेत्यांची भेट..भाजप नेत्यांकडून आदरातिथ्य
सांगली : राजकीय कार्यक्रमांवर फुली मारून केवळ अराजकीय कार्यक्रम स्वीकारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला सांगली जिल्हा दौरा छुप्या राजकीय हालचालींना जन्म देणारा ठरला. काँग्रेस नेत्यांच्या भेटीपासून भाजप नेत्यांच्या आदरातिथ्यापर्यंत त्यांच्या प्रत्येक घडामोडींमागे राजकारण शिजत असल्याची चर्चा सांगलीच्या राजकीय पटलावर सोमवारी रंगली होती.
विटा, इस्लामपूर, सांगली, कुपवाड परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावताना त्यांनी कुठेही राजकीय टीकाटिपणी केली नाही. शरद पवार प्रणित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांचा दौरा होत असल्याने ते जयंतरावांवर टीका करतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, जिल्ह्यातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी विरोधी गटावर टीका न करता केवळ केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कामांचा आढावा मांडणे पसंत केले. एरवी बेधडकपणे आरोप करण्याचे वैशिष्ट्य जपणाऱ्या अजित पवारांचे हे रूप जिल्ह्याने प्रथमच पाहिले.
राष्ट्रवादी एकसंध असतानाही जेव्हा कधी अजित पवार सांगलीत येत असत तेव्हा ते येथील राजकारणावर टीका करीत नेत्यांना चिमटे काढत असत. त्यांच्या प्रत्येक सांगली दाैऱ्यातील भाषणाचा ढाचा कायम राहिला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते वेगळ्या भूमिकेतून सांगली जिल्ह्यात आले होते, मात्र त्यांचा वावरही वेगळा दिसून आला.
अराजकीय दौऱ्याचा भास निर्माण केला तरी त्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला होता. कुपवाड येथील कार्यक्रमास शासकीय कार्यक्रमाचा शिष्टाचार पाळत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. सत्ताधारी व विरोधी नेते एकाच व्यासपीठावर होते. त्यानंतर अजित पवारांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांचीही भेट घेतली.
पक्ष विस्ताराचा कार्यक्रम
अजित पवारांनी बंड केल्यानंतरही बराच काळ सांगली जिल्ह्यात त्यांच्या गळाला कोणी लागले नव्हते. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गटात नेते, कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू झाला आहे. त्यामुळे पक्षाची उभारणी करीत जिल्हाभर विस्तार करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखल्याचे त्यांच्या गटातील नेत्यांनी सांगितले.
अजित पवार सांगलीत, जयंतराव पाटणमध्ये
जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात सोमवारी अजित पवारांनी कार्यक्रमास हजेरी लावली असताना जयंत पाटील सातारा जिल्ह्यातील पाटण येथे होते. ‘राष्ट्रवादी विजय निश्चय’ अभियानाची सुरुवातही जयंत पाटील यांनी सोमवारीच केली.