सांगली : थकीत वीजबिलापोटी कायमस्वरूपी तोडण्यात आलेले वीज कनेक्शन तात्पुरते जोडून देण्याच्या मोबदल्यात स्वत:साठी व वसुली कर्मचाऱ्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना देशिंग येथील दोन वायरमनना रंगेहात पकडण्यात आले. सुमित श्रीमंत वाघमारे (वय २१) व गणेश राजाराम भोसले (२३ दोघेही रा. खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) अशी ताब्यात घेतलेल्या दोघा कंत्राटी वायरमनची नावे आहेत, तर विजय परदेशी या वसुली कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारदारांचे रहिवासी वीज कनेक्शन थकीत वीज बिलापोटी कायमस्वरूपी तोडण्यात आले आहे. हे कनेक्शन तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठी कंत्राटी वायरमन सुमित वाघमारे याने तक्रारदाराकडे स्वत:साठी पाचशे रुपये, तर वसुली कर्मचारी परदेशी याच्यासाठी ४५०० रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. गुुरुवारी तक्रारदाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी ‘लाचलुचपत’ने सापळा लावला. त्यात सुमित वाघमारे व गणेश भोसले या दोघांनी लाचेची मागणी करत पाच हजार रुपये घेताना दोघांना ताब्यात घेण्यात आले. यात परदेशी याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तिघांविरोधात कवठेमहांकाळ पोलिसात लाचलुचपत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, संजय कलकुटगी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.