सांगली : वारणाली येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या वादाला फाटा देत काँग्रेस-राष्ट्रवादीने कुपवाडमध्ये ४० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या रुग्णालयाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो शासनाला सादर केला जाणार आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. कुपवाडसाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय वारणाली की वाघमोडेनगर या जागेच्या वादात रखडले आहे. त्यात आता ही बाब न्यायप्रविष्ट झाली आहे. जागेच्या वादाला फाटा देत राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते, रईसा रंगरेज, काँग्रेसच्या पद्मश्री पाटील यांच्यासह काहीजणांनी कुपवाडला स्वतंत्र हॉस्पिटल द्यावे, असा पवित्रा घेतला. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना भेटून साकडे घातले. जयंत पाटील यांनी महापालिकेची जागा निश्चित करून प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आयुक्त नितीन कापडणीस यांनी कुपवाडमधील सर्व्हे क्र. ४५९ मध्ये सुमारे दीड एकर महापालिकेची आरक्षित जागा निश्चित केली. त्या जागेवर ४० खाटांचे रुग्णालय उभारणीचा आराखडा तयार केला आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव तत्काळ शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठवावा, असे कापडणीस यांना आदेश दिले आहेत. त्यासाठी मंजुरी आणि निधी देण्याचे जयंत पाटील यांनी आश्वासन दिले आहे.
येत्या दोन दिवसांत तो प्रस्ताव लवकर आरोग्य विभागाकडे पाठविला जाणार आहेत. त्यामुळे वारणाली-कुपवाडच्या मंजूर हॉस्पिटलचा वाद सोडून कुपवाडमध्ये स्वतंत्र हॉस्पिटल उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य शासनाच्या आगामी अर्थसंकल्पात या रुग्णालयाचा समावेश करून निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा शेडजी मोहिते यांनी व्यक्त केली.