अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: सत्तेत असलो तरी आम्ही समान नागरी कायद्याच्या विरोधात आहोत. कायदा आणण्याचा प्रयत्न झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरु, असा इशारा पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, काही अटींवर आम्ही सरकारमध्ये सहभागी आहोत. राज्यात आमचे महायुतीचे सरकार आहे. आमच्या काही मागण्यांबाबत ते सकारात्मक पाऊल टाकत आहेत. अट्रोसिटी कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांचा निपटारा जलदगती न्यायालयात व्हावा व त्यासाठी राज्यभरात १४ न्यायालये स्थापन व्हावीत, अशी मागणी आम्ही केली आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या हिट अँण्ड रनच्या तरतुदीस आम्ही सर्वत्र विरोध नोंदविला आहे. त्यामुळे आम्ही मार्ग बदलला असला तरी तत्वे बदललेली नाहीत.
मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला तो पाळला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासह मुख्यमंत्रीही अभिनंदनास पात्र आहेत. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. त्यांच्या मागणीबाबत सरकार गंभीर होते म्हणूनच हा न्याय मिळाला. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने त्यांच्यावरही अन्याय होणार नाही, याची खात्री वाटते.
१४ फेब्रुवारीपासून शिवशक्ती-भीमशक्ती यात्रा
येत्या १४ फेब्रुवारीपासून नागपूरच्या दीक्षा भूमीपासून मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंत आम्ही शिवशक्ती-भीमशक्ती यात्रा काढणार आहोत. समता, बंधुता व मैत्रभाव जपला जावा, हा यामागे उद्देश आहे, असे कवाडे यांनी सांगितले.