प्रताप महाडिककडेगाव : राज्यभरात महाविकास आघाडीची पडझड झाली असतानाही पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात मात्र, काँग्रेसचे उमेदवार आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. त्यांनी १ लाख ३० हजार ७७९ मते मिळवून ३० हजार ६४ मतांची आघाडी घेऊन आपला ठसा उमटविला.येथे भाजप महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुखही इर्षेने लढले आणि त्यांनी १ लाख ७०५ मते मिळवून भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत केल्या. त्यांनी दिलेली कडवी झुंज दिल्याने तसेच केंद्रानंतर आता राज्यातही भाजपची सत्ता आल्याने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.आमदार विश्वजीत कदम यांच्या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांना एक नवा उत्साह मिळाला आहे. येणाऱ्या काळात राज्यातील काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी आमदार कदम हे एक प्रेरणास्रोत ठरू शकतात. त्यांचा विजय निश्चितच त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाच्या गुणांची किमया आहे. भाजप महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव झाला असला तरी त्याच्याही मागे परंपरागत जनाधार आहे. याशिवाय पक्षाचे बळही मिळाले. त्यामुळे त्यांनी लाखांचा टप्पा पार केला आहे.
गड राखला तरी आगामी काळात प्रभावी रणनितीची गरजडॉ. विश्वजीत कदम विजय मिळवून काँग्रेसचा गड कायम राखला असला तरी, त्यांना आगामी काळात मतदारांच्या अपेक्षांचा सामना करून, अधिक कार्यक्षम आणि प्रभावी रणनीती लागू करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी प्रभावी प्रचार यंत्रणा राबविल्याने त्यांनी १ लाख मतांचा टप्पा गाठला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. हा उत्साह टिकविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान आहे.
लाड गटाची ताकद कामीआ. डॉ. विश्वजित कदम यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार अरुण लाड व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड गटाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्थानिक राजकारणात लाड गटालाही योग्य स्थान मिळण्याची शक्यता आहे.