मिरज : राज्यात काही घराण्यात असलेली सत्ता सर्वसामान्यांपर्यंत नेणार असून, देशातील लुटारूंचे राज्य उचलून फेका, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात केले. पश्चिम महाराष्टÑातील लोकसभेची एक जागा मुस्लिम समाजाला देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मिरजेतील क्रीडा संकुलाजवळील मैदानावर मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जयसिंग शेडगे होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत भूलथापांमुळे काँग्रेस व राष्टÑवादी भुईसपाट होऊन प्रतिगामी सत्तेवर आले. धनगर समाजाच्या विरोधामुळे सत्ता गमावल्यानंतरही काँग्रेसला अजून समज आली नसून, बहुजन वंचित आघाडीला किरकोळ समजण्याची चूक करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत रोजगाराच्या आशेने तरूणांनी मोदींना निवडून दिले. मात्र निवडून आल्यानंतर मोदींनी भांडवलदारांना साथ दिली. नोटाबंदी करून कष्टकऱ्यांच्या श्रमाचा पैसा बुडविला. कॅशलेस व्यवस्थेचा आग्रह धरणाºया भाजपने परदेशी कंपन्यांना फायदा पोहोचविण्याचा करार केला आहे काय?चीनसारख्या शत्रुदेशाच्या कंपन्यांचा फायदा करून; आ बैल मुझे मार असे सरकारचे धोरण असताना हिंदुत्ववाद्यांचे देशावरील प्रेम कोठे गेले? राज्यात १६९ कुटुंबात आमदार, खासदार यांसह अनेक पदे असून सामान्य मराठ्यांना त्यात स्थान नाही. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांच्याशिवाय अन्य कोणीही सामान्य कुटुंबातील मुख्यमंत्री झाला नाही. पश्चिम महाराष्टÑातील सहकार चळवळीत खाबुगिरीच अधिक आहे. बाजार समित्या लुटारूंचा अड्डा बनल्या आहेत. कुटुंबशाहीमुळे लुटारूंचे फावले आहे. प्रतिगामी, सौदेबाज, नफेखोर, लुटारूंचे राज्य असेपर्यंत सामान्यांना न्याय मिळणार नाही. चोर व लुटारूंच्या टोळीला पुन्हा सत्तेपासून रोखण्यासाठी पश्चिम महाराष्टÑात सुरू असलेली वतनदारी, जहागीरदारी, इनामदारी झुगारून द्या, असे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस, राष्टÑवादीकडून बहुजन वंचित आघाडीसोबत समझोत्याच्या वल्गना सुरू आहेत. मात्र त्यांच्यासोबत जाणार नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. भाजपएवढेच काँग्रेसवालेही चोर असून राफेलवरून दोघांचे दलालीचे भांडण सुरू आहे. विमान खरेदीतील गैरव्यवहार उघडकीस आणायचा असेल, तर कॅगऐवजी लोकसभेची मुदत संपण्यास ९० दिवस असताना जीपीसीची मागणी कशासाठी? असा सवाल आंबेडकर यांनी केला.यावेळी अशोक बन्नेनवार, विनायक मासाळ, नानासाहेब वाघमारे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी, माजी आमदार हरिभाऊ भदे, बी. बी. घाडगे, इंद्रजित तांबे, गणेश मेढे, अमोल पांढरे, विक्रम कांबळे यांची भाषणे झाली.ओवेसींची गैरहजेरी, समर्थक नाराजएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी या मेळाव्यासाठी येणार असल्याचे सांगत वातावरणनिर्मिती करण्यात आली होती, पण ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याने ओवेसी समर्थकांत नाराजी दिसत होती.आघाडीसाठी अजूनही तयार, पण...यावेळी माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, काँग्रेसबरोबर आम्ही आघाडी करण्यास तयार होतो, मात्र समाझोता करण्याचे काँग्रेसचे धोरण नाही. आम्ही १२ लोकसभा मतदारसंघ मागितले, मात्र काँग्रेस नेते आमच्याशी चर्चा करण्याऐवजी माध्यमातून बोलत आहेत. सोबत एमआयएम नको आणि एक किंवा दोन जागा देतो, असा त्यांचा पावित्रा आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे स्वत:ला पंतप्रधानांपेक्षा मोठे समजतात. संघ व भाजपपासून देश वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास अजूनही तयार आहोत. मात्र काँग्रेस अनुकूल नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. राफेलवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेली टीका-टिपणी म्हणजे दोन्ही पक्षांतील दलालांची नावे बाहेर येऊ नयेत, यासाठी सुरू असलेला प्रयत्न आहे. वायुसेनेसाठी राफेल विमाने सक्षम आहेत का? याबाबतही शंका आहे, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले....तर मोदींवर खटला!आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांशिवाय सत्ता मिळविण्याचे भाजपचे धोरण काँग्रेसनेही सुरू केल्याने, ते ओवेसींना झिडकारत आहेत. मात्र आमची आघाडी लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्टÑात एक मुस्लिम उमेदवार देणार आहे. ट्रीपल तलाक कायदा काहीजणांना चांगला वाटतो. सर्व हिंदूंनाही हा कायदा लागू केल्यास सर्वप्रथम पंतप्रधान मोंदीवर खटला होईल, असेही त्यांनी सांगितले. भाजप सरकार देशातील एक-एक संस्था मोडत असून, आता विवाह संस्थाही मोडण्यास निघाले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
देशातील लुटारूंचे राज्य उद्ध्वस्त करा: प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 11:52 PM