देवराष्ट्रे : कडेगाव - पलूस तालुक्याला जोडणाऱ्या देवराष्ट्रे - कुंडल रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी अवस्था पाहावयास मिळते आहे. ओएफसीच्या कामासाठी संबंधितांनी बाजूची पट्टी उकरली आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. लहान-मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. संतापलेल्या वाहनधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
————————
रुग्णालयाकडे जाणारे सस्ते खड्डेमय
इस्लामपूर : येथील कापूसखेड नाका ते उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच मार्केट यार्ड ते उपजिल्हा रुग्णालय या रस्त्यावरही अनेक खड्डे पडले असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत जावे लागते आहे. या रस्त्यावरून उपजिल्हा रुणालयात रुग्णांना घेऊन जाताना अडचण येत आहे. पालिकेने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
———————-
शाहूनगरमधील रस्ते होणार कधी?
इस्लामपूर : शाहूनगरमध्ये सस्ते गेल्या ५ वर्षांपासून झालेले नाहीत. हे रस्ते होणार कधी, असा सवाल माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. गेली अनेक वर्षे पालिकेकडे मागणी करूनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. पालिका प्रशासन व पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष देऊन रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिवाजी पवार यांनी केली आहे.
—————————-
वारणा नदीत नावेची मागणी
बागणी : वाळवा तालुक्यातील बागणी आणि खोचीदरम्यान वारणा नदीपात्रातील नावा मध्यंतरी काही काळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता या ठिकाणी नदीपात्रात लोकांना ये-जा करण्यासाठी नावेची व्यवस्था करण्याची मागणी होऊ लागली आहे. लॉकडाऊननंतर येथे नाव सुरू करण्याची मागणी होत आहे.
——————————
इस्लामपूर पार्कमध्ये रस्त्याची मागणी
इस्लामपूर : येथील रिंग रोडच्या पूर्वेस असणाऱ्या यशोधननगर परिसरातील मंडले प्लॉटमधील नगरपालिकेने केलेल्या गटाराला नैसर्गिक ढाळाप्रमाणे लगतच्या कासम पार्कमधील रस्त्याचा मार्ग खुला करावा. त्यामुळे ही गटारी वाहती होतील, गेल्यावर्षी सांडपाण्यामुळे काविळीची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने कासम पार्कची पाहणी करून पर्यायी रस्ता, गटारी खुल्या करून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
————————-
शॉपिंग सेंटरच्या नावाचा फलक करावा
इस्लामपूर : इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर पालिकेचे क्रांतिसिंह नाना पाटील शॉपिंग सेंटर आहे. या ठिकाणी नावाचा नवीन फलक करण्याची मागणी गाळेधारकांतून होत आहे. या इमारतीला क्रांतिसिंह नाना पाटील शॉपिंग सेंटर असे नाव आहे. पालिकेने हे नाव गेल्या अनेक वर्षांपूर्वी दिले आहे. हा फलक खराब झाला आहे. येथे नवीन फलक लावावा, अशी मागणी हाेत आहे.
————————
यशोधननगरमध्ये सांडपाणी रस्त्यावर
इस्लामपूर : येथील रिंग रोडच्या पूर्वेस असणाऱ्या यशोधननगरमधील शिवधन पार्कमध्ये अद्याप गटारीच नाहीत. सर्व घरातील सांडपाणी शोषखड्ड्यामध्ये घातले असले तरी अनेक घरांचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पालिकेकडे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी गटारी, रस्त्यांसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. तरीही पालिकेने कार्यवाही केलेली नाही. पालिका प्रशासनाने या परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
—————————-
इस्लामपूर पुलावरील कठड्यांची दुरवस्था
वाळवा : वाळवा - इस्लामपूर रस्त्याला असणाऱ्या ओढ्यावरील पुलांचे सिमेंटचे संरक्षक कठडे तुटून वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ते दुरुस्त करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होऊ लागली आहे.
——————————
मका विक्री नोंदणीस अल्प प्रतिसाद
लेंगरे : खानापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची आधारभूत किमतीने मका विक्रीसाठी नाव नोंदणीकडे पाठ फिरवली आहे. खानापूर, आटपाडी, कडेगाव तालुक्यातील मका उत्पादकांसाठी विटा येथे बाजार समितीत मका खरेदी केंद्र मंजूर झाले आहे. आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नांमुळे या केंद्रास मान्यता मिळाली. मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे बाजार समितीमार्फत आवाहन करण्यात आले होते. एप्रिलअखेरपर्यंत नोंदणीची मुदत होती. या मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्याने रबी हंगामातील मका खरेदी सुरू होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मका विक्री केली. या व्यापाऱ्यांनी मनमानीपणा करून कमी दराने मका खरेदी केली आहे.
——————
नाना पाटील शॉपिंग सेंटरमध्ये कचरा
इस्लामपूर : येथील तहसील कचेरीसमोरील नगरपालिकेच्या क्रांतिसिंह नाना पाटील शॉपिंग सेंटरमध्ये अनेक गाळाधारक आहेत. या शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शॉपिंग सेंटरमध्ये वर जातानाच एका मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. येथे डासांचे प्रमाण वाढले आहे. पालिका प्रशासनाने हा कचऱ्याचा ढीग हलवावा, अशी मागणी होत आहे.
—————————-