सांगली : कृषि विषयक विविध योजनांची माहिती देणारे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे मोबाईल ॲप विकसित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्हा नियामक सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, आत्माचे प्रकल्प उपसंचालक एस. जी. फाळके आदि अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कृषि उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करता यावी, यासाठी शेतकऱ्यांना दिशा मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सांगली जिल्ह्याची पीकपरिस्थिती आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गरज ओळखून मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.
या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीकमाहिती, कीडनियंत्रण, प्रशिक्षण, यशकथा यांची माहिती मिळणे शक्य होईल. तसेच, शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होईल. हे ॲप युझर फ्रेंडली असावे, जेणेकरून ते ग्रामीण भागातील व सामान्य शेतकऱ्यांनाही वापरता येईल, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे व प्रबोधन करावे. तसेच, सेंद्रिय शेतीमाल विकण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या सेंद्रिय जत्रा या मॉलचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. ई मार्केटिंग, होम डिलिव्हरी आदिंबाबत तसेच, स्थानिक मॉलमध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी समन्वय साधावा, असे त्यांनी सूचित केले.तसेच, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी नवीन शेतीप्रयोगांकडे वळण्यासाठी अनुषंगिक मार्गदर्शन करावे. जिल्हांतर्गत भेटीवेळी अशा यशस्वी प्रयोगांना आवर्जून भेटी द्याव्यात, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आगामी वर्षाचे नियोजन करताना प्रत्येक शेतकरी कोणत्या ना कोणत्या गटाशी जोडला जाईल, याची दक्षता घ्या. यासाठी कृषि व मत्स्य, रेशीम विकास, पशुसंवर्धन आदि कृषिपूरक सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
सक्रिय शेतकरी निवडून त्यांना विविध कृषिविषयक योजनांचा लाभ दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अन्य अनुषंगिक बाबींसाठी सहाय्य करा. तसेच, कृषि व फळ प्रक्रियेवरही भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते कृषि विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या फळबाग वाचवा अभियान ही घडीपत्रिका, रोपाद्वारे ऊस लागवडीतून शाश्वत ऊस उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांची शेतीशाळा माहितीपुस्तिका यांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, इस्लामपूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा कृषि महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग नोंदवल्याबाबत अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.स्वागत व सादरीकरण बसवराज मास्तोळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण बनसोेडे यांनी केले. सर्जेराव फाळके यांनी आभार मानले. यावेळी कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.