सांगली : कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना निधी कमी पडून देणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.कवठेपिरान येथे आयोजित विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भिमराव माने, हुतात्मा दुध संघाचे गौरव नायकवडी, शेखर इनामदार, सरपंच सौ. गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हिंदकेसरी पै. मारूती माने विकास कार्यकारी सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिंदकेसरी पै. मारूती माने यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच 3 कोटी 65 लाख रूपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचा व 4 कोटी रूपये खर्चाच्या पूरसंरक्षक घाटाच्या कामाचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी नुतन खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कवठेपिरानसह आठ गावातील विविध विकास कामांना लागणारा निधी कमी पडू देणार नाही. प्रामुख्याने या परिसरात आवश्यक असणारे ग्रामीण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येतील. शिवप्रतिष्ठानतर्फे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल.कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शासन शेती आणि शेतकरी यांना प्राधान्य देवून विविध योजना, ध्येय, धोरणे राबवत आहे. कृषि कर्जमाफी, कोतवालांची मानधन वाढ, शेतकरी सन्मान योजना यासारखे अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय शासन राबवित आहे.खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्वसामान्य माणसांसाठी अखंड काम करू. सर्व सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न समजवून घेऊन काम करू अशी ग्वाही दिली.भिमराव माने यांनी कवठेपिरानसह आठ गावातील विकास कामे मोठ्या प्रमाणावर व्हावीत, दर्जावाढ केलेले रस्ते, शिवसृष्टी यासारखी कामे प्राधान्याने व्हावीत अशी विनंती केली.यावेळी कवठेपिरान पंचक्रोशीतील नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.