कवठेमहांकाळ : नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी कवठेमहांकाळ शहराचा विकास करण्याचा संकल्प केला आहे. शहरात आजवर स्वच्छ, सुंदर परिसर संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून राबवली नाही. परंतु नगरपंचायतीमध्ये नुकतेच मुख्याधिकारी म्हणून डॉ. संतोष मोरे, शहर समन्वयक ऋतुजा गावडे हे अधिकारी दाखल झाले आहेत. या नवीन अधिकाऱ्यांनी शहराचा मेट्रो सिटीच्या धर्तीवर विकास करण्यास सुरुवात केली आहे.
‘स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावी राबवण्यात येत आहे. कवठेमहांकाळ शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘आय लव्ह यू’ पॉईंट व छोटेसे गार्डन शहरातील नागरिकांचे विरंगुळा ठिकाण ठरले आहे. या अभियानामुळे शहरात कमालीची स्वच्छता ठेवली जात आहे. नगरपंचायतीमधील सफाई कर्मचारी, सर्व अधिकारी यांनी मिळून शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, इतर शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले. शहरात आरोग्य मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी असणारी शौचालये तपासण्यात आली. शाळा, महाविद्यालय या ठिकाणीही सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. शहरात नागरिक, जनता या मोहिमेचे स्वागत करत आहे. एकूणच कवठेमहांकाळ शहर हे मेट्रो सिटीच्या धर्तीवर स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचा ध्यास मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, शहर समन्वयक ऋतुजा गावडे, गोपीनाथ तरडे, पंकज घेवरे, जालिंदर माने यांनी घेतला आहे. यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधीही प्रयत्नशील आहेत.
चौकट
शहराचा चेहरा बदलणार : संतोष मोरे
शहरातील कुची कॉर्नर, जुने बसस्थानक या मुख्य चौकात आकर्षक प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. मेघराजा टेकडी ही शहरातील मिनी पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. कवठेमहांकाळ शहर हे स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत पूर्णपणे स्वच्छ, सुंदर करून जनतेचे आरोग्य कसे सुधारले जाईल, याकडे नगरपंचायत लक्ष देत आहे. शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलला जाईल, अशी प्रतिक्रिया नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांनी दिली.
कोट
शहरातील जनतेने ‘स्वच्छ सर्वेक्षण’, ‘माझी वसुंधरा’ अभियानात सक्रिय व्हावे. हे अभियान यशस्वी करावे. राज्यात शहराची एक वेगळी ओळख निर्माण करावी.
-ऋतुजा गावडे, शहर समन्वयक, नगरपंचायत, कवठेमहांकाळ